top of page
Writer's pictureCCE Finland

कल्पक होण्याच्या दिशेने


नमस्कार, मी कल्पकतेच्या क्षेत्रात काम करते .. असं कुणालाही सांगितलं, की तत्क्षणी समोरच्या व्यक्तीकडून अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. अरे वा .. छान असे उद्गार हवेत विरून जातात आणि या क्षेत्राविषयी उत्सुकतेपोटी ऐकणारा एकापाठोपाठ एक प्रश्न विचारू लागतो. कल्पकता म्हणजे ? कल्पक होणे म्हणजे काय ..? कोण कल्पक होऊ शकतो ? कल्पकता नेमकी कुठे दडलेली असते ? फक्त कलाकारच कल्पक असतात का ? कला किंवा हस्तकलेच्या परिघांबाहेरदेखील आपण कल्पकतेचा विचार करू शकतो का ?कल्पकता शिकता येऊ शकते का ?दैनंदिन जीवनात कल्पक दृष्टीकोन बाळगून काम करता येईल ?मग त्याचा नेमका काय फायदा होऊ शकतो ?शालेय शिक्षणावर त्याचा परिणाम कसा होतो ?प्रश्न, प्रश्न , प्रश्न ..... कल्पकतेचा विचार करायला सुरूवात करताक्षणी तुमच्या देखील मनात हेच सारे प्रश्न आपोआपच उपस्थित झाले असावेत. संशोधन, वाचन, निरीक्षण आणि या क्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवांच्या आधारावर या सा-या प्रश्नांची उत्तर सदर स्तंभाद्वारे आपणास मिळतील.शिक्षणासाठी दशदिशांना गवसणी घालू इच्छिणारी मुलं नेमकी मागे कुठे आणि का पडतात या प्रश्नाने पछाडलेलेल पालक मला अनेकदा भेटतात. आम्ही मुलांना सारं काही दिलं, उत्तम शिक्षण देईल अशी शाळा, बाजारपेठेत उपलब्ध असलेली उत्तम शैक्षणिक साधनं, घरातील प्रसन्न वातावरण आणि मुलाने मोठं नाव कमवावं यासाठी लागणा-या प्रत्येक गरजा पूर्ण करूनही आमच्या मुलाला दिशा सापडत नाही अशी खंत करणारे पालक पाहिले की फार वाईट वाटतं. वाईट अशासाठी वाटतं की पालक आणि मूलं दोघांनीही अहोरात्र कष्ट केलेले असतात पण परिणाम मात्र योग्य तो मिळत नसतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे नव्याने विचार करण्याचा, अर्थात सृजनशीलतेचा आणि कल्पकतेचा अभाव. पाठांतर वगैरे करून मार्क मिळवण्याचा जमाना आता गेला याचीजरादेखील कल्पना नसलेले पालक एकीकडे आणि शाळेच्या वातावरणात नावीन्याचा शोध घेण्याऐवजी मार्कांकरीता अभ्यास करणारी मुलं जगाच्या पाठीवर आपला वेगळेपणाचा ठसा उमटवण्यात यशस्वी होणार ती कशी ? केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगालाच आज नाविन्याच्या संकल्पनेने पछाडलेले आहे. कल्पकता आणि सृजनशीलता ज्यांच्याजवळ आहे अशा व्यक्तींना रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळेच कल्पकतेच्या दिशेने विचार करण्याचे पहिले पाऊल आपण सा-यांनीच उचलणे अपरिहार्य झाले आहे. या स्तंभाद्वारे वाचकांना कल्पकतेच्या या दुनियेची रम्य सफर घडवण्यात येईल तसेच वेळोवेळी आपल्या शंकांचे समाधान करण्यास व आपल्याला मार्गदर्शन करण्यास मी उत्सुक आहे.


103 views0 comments

Comments


bottom of page